ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्करला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वाटप, आशा वर्करांच्या कार्याचा केला गौरव


ठाणे : कोरोनाच्या लढाईत प्रत्येक्षपणे कार्यरत असणाऱ्या ठाणे जिल्हा परिषदेच्या आशा वर्कर यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते फेस शिल्डचे वितरण करण्यात आले. गुरुवारी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुरक्षित अंतर ठेवत पडघा आरोग्य केंद्र येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. 


यावेळी श्री.देशमुख यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर करत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले.त्याचबरोबर कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर विविध विभागाचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. जनताही उत्तम सहकार्य करत आहे, त्यामुळे आपण कोरोनावर मात करून ही लढाई नक्की जिंकू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शासन करत असलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी डॉक्टर सेल च्या नेटवर्क च्या माध्यमातून असा प्रकारे मदत राज्यभर पोहचवण्यात आली आहे. याच उपक्रमाचा दुसरा टप्पा आज पासून सुरू होत आहे. राज्यभरातील 'आशा वर्कर' ना या फेसशिल्डचे वितरण आज पासून सुरूवात करण्यात येत आहे.'आशा वर्कर' या देखील रूग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असल्याने त्यांना स्वसंरक्षणासाठी या सुरक्षाकवचाचा फायदाच होईल असे श्री.देशमुख म्हणाले.


या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, आमदार शांताराम मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.शिवाजी राठोड, ठाणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर, कृषि,पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, भिवंडी प्रांत मोहन नलदकर , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, भिवंडी गट विकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे, ट्रस्टचे पदाधिकारी ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) दशरथ तिवरे, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. 


ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा वर्कर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. जिल्ह्यात सध्या अकराशे सहा आशा वर्कर कार्यरत आहेत. त्यांचा लोकांशी प्रत्येक्ष संपर्क येत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून फेसशिल्डमुळे करोना बाधीत किंवा संशयित रूग्णाकडून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.